सर्वाधिक परिणाम रात्री 8 ते 10 या वेळेत; इतर वेळेत 125 एक्यूआय
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून (एक्यूआय) एखाद्या शहराचे वायूप्रदूषण किती आहे, हे ठरवले जाते.अमरावती शहराचा एक्यूआय सरासरी १२५ असतो. पण दिवाळीच्या दिवशी फोडल्या गेलेल्या फटाक्यांमुळे रात्री आठ ते दहा यावेळात तो तब्बल अडीच पट वाढून ३१४ वर पोहाेचला होता. ही बाब शास्त्रीयदृष्ट्या ‘व्हेरी पुअर’ या व्याख्येत मोडते. त्यामुळे त्या दोन तासांत आजारी नागरिकांना श्वास घेण्यासाठी काहीसा त्रास जाणवला असेल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी)म्हणणे आहे.
या वर्षीच्या दिवाळीला मंगळवारी रात्री शहराच्या अनेक भागात धुराचे लोट उठताना दिसले.हे लोट फटाके फाेडल्यामुळे निघालेल्या धुरांचे होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वायू प्रदूषणात बऱ्यापैकी वाढ झाली होती. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या हवामान केंद्राने या वायू प्रदूषणाची नेमकी मोजदाद केली आहे. दरम्यान नागपूर येथील हवामान खात्याचे स्थानिक अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील या आकड्यांना दुजोरा दिला असून,मंगळवारच्या रात्री अमरावतीचे आकाश काही काळासाठी ३०१ ते ४०० च्या दरम्यानच्या ‘व्हेरीपुअर’ या व्याख्येत पोहोचले होते. शहराचा मुख्य परिसर असलेल्या अंबागेटच्या आतील जुने शहर आणि कॅम्पसह विद्यापीठ रोड,वडाळी, श्रीकृष्ण पेठ, राजकमल चौक,साईनगर, गाडगेनगर आदी भागांमध्ये हीच आकडेवारी कायम होती, असे एमपीसीबीचे म्हणणे आहे.
एरव्ही अमरावती शहराचा रोजचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा १०१ ते २०० या मॉडरेट व्याख्येत मोडणारा असतो. याची मोजदाद सरासरी १२५ ते १३० असते.
तज्ज्ञांच्या मते हवेतील धूलिकण आणि वाहनांमधून होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन यामुळे हवा प्रदूषित होते. परंतु अमरावती शहराच्या काही भागांत असलेल्या हरित पट्ट्यांमुळे ते नियंत्रितही केले जाते.त्यामुळे हे शहर ६ ते १० लाख लोकसंख्येच्या महानगरांपैकी शुद्ध हवेचे एक महानगर म्हणून ओळखले जाते.दरम्यान दिवाळीच्या दिवशी वाढलेल्या प्रदूषणामुळे मात्र काही वेळासाठी ते वेगळ्या व्याख्येत गेले होते. हवामान केंद्राने केलेल्या मोजणीनुसार अमरावती शहराचा त्या दिवशीचा एक्यूआय हा १२५होता. रात्री ८ नंतर मात्र तो बदलला आणि दहाच्या पुढे पुन्हा सामान्य झाला. दरम्यान जिल्ह्यातील इतर तालुक्याचा एक्यूआय सुद्धा ६९ ते १२५ दरम्यान फिरत राहिला.
हरित फटाके आणि पावसाचाही फायदा
यंदा दिवाळीत काही प्रमाणात झालेला हरित फटाक्यांचा वापरआणि ऐन लक्ष्मीपूजनाच्या काहीवेळ आधी दुपारी आलेला पाऊस यामुळे धूलिकण दबले गेले. याचा परिणाम म्हणूनही दिवाळीत फटाक्यांचे प्रदूषण अधिक प्रमाणात जाणवले नाही. केवळ रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडल्याने प्रदूषणाची पातळी काहीशी वाढून एक्यूआय ३१४ वर पोहाेचला होता.
नागरिकांनी अशी घ्यावी दिवाळीमध्ये काळजी
वायू प्रदूषणाची पातळी वाढत असताना सार्वजनिक आरोग्याचे धोकेही वाढतात. विशेषत: मुले, वृद्ध आणि श्वसन किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या असलेले व्यक्ती हे सामान्यतः खराब हवेच्या गुणवत्तेमुळे प्रभावित होणारे पहिले गट असतात. जेव्हा एक्यूआय जास्त असतो, तेव्हा लोकांनी खुल्या जागेतील शारीरिक हालचाली कमी कराव्या किंवा पूर्णपणे बाहेर जाण्याचे टाळण्यास प्रोत्साहित करतात. - डॉ. रूपेश काळे, नमूना, अमरावती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी