यशोमती ठाकूर मित्रमंडळ व तालुका काँग्रेस कमिटीचा उपक्रम
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
महाराष्ट्रात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी तसेच फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु दिवाळी सणाच्या तोंडावर शासकीय मदत न पोहोचल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव वानखडे यांनी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट देत दिवाळीचा शिधा म्हणून किराणा, साडीचोळी देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली.
गेल्या पाच महिन्यांत तिवसा तालुक्यात आर्थिक विवंचनेतून सात शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, फळबाग या पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तालुक्यातील सर्वच मंडळांत नुकसानाचा आकडा मोठा आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची
आस लागून होती. मात्र तालुक्यातील किती तरी शेतकऱ्यांच्या पदरात अजूनपर्यंत मदत पडली नाही. त्यामुळे दिवाळीसारखा मोठा सण साजरा होणार कसा, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. तेव्हा माजी मंत्री यशोमती ठाकूर मित्रमंडळ व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वैभव वानखडे यांच्या नियोजनातून तालुक्यातील वहा, ममदापूर, शिरजगाव मोझरी, निंभोरा, सालोरा आदी गावांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देत सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना घरपोच दिवाळीनिमित्त किराणा, साडीचोळी देण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष वैभव वानखडे, मुकुंद पुनसे, नीलेश खुळे,
पंकज देशमुख, डॉ. निरंजन गणोरकर, रावसाहेब देवघरे, प्रशांत कांबळे, गजानन चर्जन, संदीप हगवणे, निरंजन कडू, विजय डोंगरे, सूरज चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जाहीर केलेली मदत एक आशेचा किरण असताना तीसुद्धा तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. अनेक पक्ष व संघटनांची आंदोलने, निवेदने झाल्यावर शासननिर्णय निर्गमित झाला, परंतु मुळात शेतकऱ्यापर्यंत खरी मदत पोहोचलीच नाही. त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबविला.
-वैभव वानखडे, तालुका अध्यक्ष काँग्रेस.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी