अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
श्री छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय, तिवसा येथे वाचनालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ८० लक्ष रुपये निधी मंजूर झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास वाचनालयाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, शिक्षकवृंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात वाचनालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रशासकीय आणि कार्यकारी पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, “श्री छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय हे तिवसाचे एक ज्ञानमंदिर आहे. येथील वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक, सुबक आणि सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीत तरुणांसाठी अभ्यासिका, वाचन कक्ष आणि डिजिटल लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.”
कार्यक्रमानंतर नियोजित इमारतीच्या जागेवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिवाळी पाडव्याचा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तिवसा शहरातील नागरिक, ग्रंथप्रेमी विद्यार्थी, समाजसेवक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी