शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करून हमी भावाप्रमाणे खरेदी करा
अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गावा - गावात चौका -चौकात शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोयाबीन फेको आंदोलनाची राज्यव्यापी हाक दिली. त्याचाच एक भाग म्हणून नांदगाव खंडेश्वर शहरातील मुंगसाजी चौकात किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन जमिनीवर फेकून राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. राज्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. यंदा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामध्ये शासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळेही शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने शेत पिकांची नुकसान भरपाई अजूनही दिली नाही. शासनाच्या या उदासीन धोरणाचा विरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या वेळी किसान सभेचे जिल्हा सचिव शाम शिंदे, माजी युवासेना नेते प्रकाश मारोटकर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचे सह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
तसेच या वेळी इडा पिळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, या घोषणा देवून शेतकऱ्यांचा राजा सम्राट बळीराजाचा गौरव दिन साजरा करण्यात आला. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सरकारने ही केंद्र लवकर सुरू करावी,अशी मागणीही यादरम्यान करण्यात आली.
तोटा सहन करावा लागल्याने अडचणीत सरकारने हमीभावाने सोयाबीन ५३२८ रुपये व कापूस ८१०० रुपये क्विंटल दराने, शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत, यासाठी सोयाबीन फेकून आंदोलन करण्यात आले. शासनाने सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १०००० ते १२ हजार एकरी तोटा सहन करावा लागत आहे. फडणवीस सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असून त्यांचा घोषणाबाजी करत धिक्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी