धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा - आ. कैलास पाटील
धाराशिव, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमी
आमदार कैलास पाटील


धाराशिव, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत आणि 'भावांतर योजना' लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर फरकाची रक्कम जमा करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जमिनीत पाणी साठल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढला, पिकांची वाढ खुंटली आणि जमीन खरडून गेली. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते, मात्र ती अद्याप न मिळाल्याने सणाचा खर्च आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे.

सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल घोषित करण्यात आला असताना, बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असून, केवळ ३,००० ते ३,५०० रुपये दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे. हमीभाव केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

तसेच, विधानसभा निवडणूकीच्या वेळी हमीभावापेक्षा कमी किंमतीत विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'भावांतर योजना' सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेची अंमलबजावणी करून, ज्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन व इतर पिकांची विक्री केली आहे, त्यांना हमीभाव व विक्री किंमत यातील फरकाची रक्कम या योजनेद्वारे थेट खात्यावर वर्ग करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या दोन्ही मागण्यांवर पणन मंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार कैलास पाटील यांनी या निवेदनातून केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande