सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
ऐन दिवाळीत सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाके फुटत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपाने इतर पक्षातील ५ माजी आमदारांना गळाला लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात चर्चा करत या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. विशेष म्हणजे या माजी आमदारात सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादीचे ३ माजी आमदार आहेत. मात्र या पक्षप्रवेशावरून स्थानिक भाजपा कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यातच भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांचा उद्रेक भाजपाच्या कार्यालयासमोर पाहायला मिळाला. सोलापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी फडणवीसांनी एका रात्रीत गेम फिरवला. बुधवारी देवेंद्र फडणवीस सोलापूरात होते. हा दौरा जिल्ह्यातील राजकारणाला निर्णायक वळण देणारा ठरला. कार्यक्रमाच्या स्टेजवरच सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही फडणवीसांना भेटले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही देवेंद्र फडणवीस यांना भेटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड