अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
तिवसा शहरात जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनेक वर्षापासून मकाजी बुवाची मूर्ती असून या ठिकाणी सालाबादाप्रमाणे दिवाळीच्यानिमित्ताने गाई म्हशीचा परंपरागत खेळ खेळविला जातो. मात्र यावर्षी याठिकाणी पोलीसांनी लाठीचार्ज केल्यामुळे या खेळाला गालबोट लागले आहे. पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जमुळे संताप्तनागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर फटाके फोडले तसेच दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला.
शहरातील मुख्य बाजारपेठ व जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली मकाजी बुवा याची पूजा करून शहरातील पशुपालक शेतकरी आपल्या गाई म्हशींची ओवाळणी करून त्यांना खेळवतात, दिवाळी साजरी करतात. संपूर्ण बाजारपेठ दुपारी दोन वाजता बंद करून हा परंपरागत खेळाचे सादरीकरण केले जाते. मात्र यावर्षी याठिकाणी असलेला पोलीसांच्या अतिरिक्त बंदोबस्त व नागरिकांवर झालेला लाठीचार्जमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांच्या वाहनावर फटाके फोडण्यात आलेत. दारूच्या बॉटल, दगड फेकण्यात आले. यावेळी हौशी तरुण व नागरिकांचा मोठा गदारोळ दिसून आला.
दरवर्षी शहरात गाई म्हशीचा पारंपरिक खेळ खेळविला जातो. मुख्य बाजार पेठेतील काही नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याठिकाणी बंदोबस्त लावला होता, परंतु याठिकाणी वाहनावर तसेच अंगावर फटाके फोडल्याचा प्रकार घडल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला. घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या.
- गोपाल उपाध्याय, ठाणेदार.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी