पुणे, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागलेले आहेत. दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.एकीकडे स्थानिक निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चांना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अनेक शिक्षण नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असतानाच रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाने महायुतीचा पुणे शिक्षक मतदार संघासाठी उमेदवार ठरला असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मतदार नोंदणी सध्या जोरात सुरु आहे. महायुतीकडून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण चळवळीतील शिक्षकांचे नेतृत्व करणारा चेहरा म्हणत नंदकुमार सागर यांचे कौतुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे नंदकुमार सागर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु