
जालना, 27 ऑक्टोबर (हिं.स.)आज जालना येथे सकल जैन समाजाच्या वतीने आज जालना शहरात भव्य जनआंदोलन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. पुणे जैन बोर्डिंग होस्टेल विक्री करार रद्द व कुंथलगिरी येथील प्रतिमा चोरी प्रकरणाविरोधात जनआंदोलन करण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध जैन बोर्डिंग होस्टेल व महावीर जिनालय पुणे यांच्या विक्री करार रद्द करण्याची मागणी तसेच कुंथलगिरी येथील पवित्र प्रतिमा चोरी प्रकरणाचा निषेध या दोन गंभीर विषयांवर सकल जैन समाजाच्या वतीने आज जालना शहरात भव्य जनआंदोलन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सकल जैन समाज, जालना यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडली. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली फेरी मारत निघाली. समाज बांधवांनी जैन धर्माची अस्मिता जपू या, जिनालय विक्री करार रद्द करा, प्रतिमा चोरी प्रकरणात दोषींना अटक करा अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. या प्रसंगी अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून सकल जैन समाज बांधवांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यांनी समाजाच्या भावना ऐकून घेतल्या आणि शासनाच्या पातळीवरून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, धर्मस्थळांचे रक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग व जिनालय हे केवळ जैन समाजाचे नव्हे, तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या संदर्भातील करार रद्द व्हावा आणि कुंथलगिरी प्रतिमा चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. या रॅलीत शहरातील जैन समाजाचे अनेक मान्यवर, युवक-युवती, महिला वर्ग, व्यापारी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis