
नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता आपली सामायिक जबाबदारी (दक्षता जनजागृती सप्ताहाचे) आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन आज लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जनजागृतीसाठी सर्व पथके जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस निरीक्षक करीमखाँ पठाण, साईप्रकाश चन्ना, अर्चना करपुडे, अनिता दिनकर, पोलीस अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन सत्यनिष्ठेबाबतची शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन करण्यात करण्यात येवून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती बाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बँनर, स्टिकरचे विमोचन करण्यात आले.
जिल्ह्यातील तालुका पातळीवर तसेच जिल्हास्तरावर शासकीय विभाग, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे इ. ठिकाणी पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी नागरिकांना लाच देणे व घेणे हा गुन्हा असून ‘भ्रष्टाचार मिटवू हा देश पुढे नेऊ’ या घोष वाक्याची माहिती देवून प्रबोधनपर आवाहन त्यांनी केले.
आकाशवाणी नांदेड येथून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधिक्षक हे नागरिकांना आवाहन करणार आहेत. तसेच शासकीय कर्मचारी तसेच त्यांचे कुटूंबिय यांचे भ्रष्टाचार विरोधी संदर्भान्वये विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांच्या भेटी घेवून, सार्वजनिक दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर, स्टिकर, लावून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांनी केले आहे.
पोलीस अधिक्षक संदीप पालवे -02462-255811, मो.क्र.9226484699 , अपर पोलीस अधीक्षक-02462-255811, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार -9359056840, टोल फ्री-1064, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रमांक-02462-253512
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis