
रत्नागिरी, 27 ऑक्टोबर, (हिं. स.) : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील, अशा पद्धतीचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारले जाईल. रत्नागिरीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. त्यात कुठेही कमतरता पडू देणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी शहर पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता अनुदानांतर्गत श्री विठ्ठल मंदीर परिसर सुशोभीकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त आनंद मराठे, विजय पेडणकर, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, बंड्या साळवी, राजू तोडणकर, प्रमोद रेडीज, मुन्ना सुर्वे, शिल्पाताई सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, या मंदिराला तीन कोटी रुपये उपलब्ध करून देता आले. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि ठेकेदार घेतील. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. शिवसृष्टी झाल्यापासून आतापर्यंत एक लाख वीस हजार पर्यटकांनी शिवसृष्टी बघितली. देशातील अंडरआर्म पहिले क्रिकेटचे स्टेडियम रत्नागिरीमध्ये होणार आहे. या स्टेडियमला कान्होजी आंग्रे यांचे नाव दिले जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८९ नगरपालिकांमध्ये नमो उद्यान करण्याचा निर्णय घेतला. त्यातील नावीन्यपूर्ण उद्यान रत्नागिरीत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी