
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. भीमा, सीना अशा सर्वच नद्यांना महापूर आला होता. विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. उजनी धरणही १०० टक्के भरलेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी सव्वादोन मीटरने वाढल्याचे भूजल सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
भूजल सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात माढा तालुक्याची भूजलपातळी ३.२३ मीटरने वाढली आहे. त्याखालोखाल उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याची भूजलपातळी अडीच मीटरने वाढल्याचे दिसून आले. गतवर्षी जिल्ह्यातील १४० हून जास्त गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. उजनी धरणाचीही पातळी उणे ४० टक्क्यांपर्यंत गेली होती. पाणी पातळीत दीड मीटरने घट झाली होती. पण, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात बार्शी, करमाळा हे दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांची भूजलपातळी दोन ते सव्वातीन मीटरपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. भूजलपातळी मोजण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १५८ विहिरींचा सर्व्हे करण्यात आला, त्यातून हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ३.९० मीटर राहिली आहे. यंदा सप्टेंबरमधील भूजलपातळी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली असल्याचेही भूजल सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड