
चंद्रपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या १२ दुर्गांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा वस्तू संग्रह यादीत समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींच्या या ऐतिहासिक दुर्गांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने “अमृत दुर्गोत्सव २०२५” साजरा करण्यात येणार आहे.या उपक्रमात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध सेवा संस्था, महामंडळे, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, औद्योगिक व व्यापारी संस्था तसेच सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी (शिवनेरी, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साळ्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड आणि जिंजी) या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करावी आणि त्या दुर्गासोबत स्वतःचा फोटो www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करावा. फोटो अपलोड करण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे.फोटो अपलोड करणाऱ्या प्रत्येक सहभागीला मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होईल. तसेच ‘शिवरायांच्या कथांचा’ ९९९ रुपयांचा ऑनलाइन कोर्स निःशुल्क देण्यात येणार आहे.या उपक्रमाद्वारे ऐतिहासिक दुर्गांविषयी अभिमान, इतिहासप्रेम आणि सांस्कृतिक जागर निर्माण करणे हा उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात उपलब्ध जागेत दुर्गाची प्रतिकृती तयार करून या राज्यव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन विक्रम पांडे, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव