चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय कंत्राटी भरती बंद - अमरावती मनपा आयुक्त
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। अग्निशमन विभागात नुकताच असा प्रकार घडलेला आहे. अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीचेही कर्मचारी महापालिकेत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळताच मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय कर्मचाऱ्यांची भरती करू
चारित्र्य तपासणी अनिवार्य; प्रमाणपत्राशिवाय कंत्राटी भरती बंद  महापालीका आयुक्तांनी जारी केले आदेश


अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। अग्निशमन विभागात नुकताच असा प्रकार घडलेला आहे. अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीचेही कर्मचारी महापालिकेत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळताच मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय कर्मचाऱ्यांची भरती करू नये, असे आदेश जारी केले आहेत. अग्निशमन विभागासह उद्यान विभागातील सात ते आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एका राजकीय पक्षात प्रवेश घेतल्याची तक्रार आयुक्त सौम्या शर्मा यांच्याकडे प्राप्त झाली होती.

रिक्त पदांमुळे महापालिकेच्या वेगवेगळ्या कार्यालयांत कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने असून, त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय कार्यकर्तेच कर्मचारी बनले आहेत. त्यामुळे बे लगाम होत चाललेले हे कर्मचारी आता विभागप्रमुखांसाठीही डोकेदुखी ठरले असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत कार्यकर्ते कर्मचारी म्हणून रूजू होत होते. आता मात्र कंत्राटी कर्मचारी उघडपणे राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानंतर दोन दिवसांपूर्वीच त्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. शिवाय आता प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याला चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अग्निशमन उपकेंद्रातील एका कर्मचाऱ्याचा गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याला अटकही करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे त्याला अटक झाली असतानाही तो कर्तव्यावर कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले.

याशिवाय बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग, झोन कार्यालयांतही राजकीय कार्यकर्ते कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. महापालिकेत बड्या नेत्यांच्या बैठकीला संबंधित कर्मचारी, कार्यकर्ते बनून बिनदिक्कतपणे काम सोडून नेत्यांच्या अवतीभोवती वावरत असल्याचे दिसून येते. अनेक कंत्राटी कर्मचारी गरजवंत असून, महिनोमहिने त्यांना वेतन मिळत नसतानही ते प्रामाणिकपणे सेवा देत आहेत; त्यामुळे राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनीच वचक निर्माण करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande