
गडचिरोली, 27 ऑक्टोबर (हिं.स.)
गडचिरोलीत आज, 27 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात मोठी राजकीय घोषणा करण्यात आली. काँग्रेसने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या रूपाने कविता सुरेश पोरेड्डीवार यांची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर गडचिरोली नगरपरिषदेच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, विजय गोरडवार आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. पक्षप्रवेश कार्यक्रमातच सुरेश पोरेड्डीवार यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली.
आपल्या भाषणात आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रामाणिक व स्वच्छ चेहरा देण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. कविता पोरेड्डीवार या त्या भूमिकेस साजेशा उमेदवार आहेत. ते पुढे म्हणाले, पोरेड्डीवार कुटुंब हे काँग्रेस विचारसरणीशी नाळ जोडलेले आहे. घर दोन असले तरी विचार एकच आहे. आता हे घर पुन्हा एकत्र आले असून काँग्रेसची ताकद दुप्पट झाली आहे.
वडेट्टीवारांनी यावेळी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढविला. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील एक राजा सर्वकाही मीच जिंकणार या तोर्यात वावरतो. पण या राजाला लगाम घालण्याची ताकद काँग्रेसकडे आहे. लोक आता भाजपमधील दलालीला, हप्तेखोरीला वैतागले आहेत. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी भाजप सरकारच जबाबदार आहे. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजपला निश्चितच धडा शिकवेल.
या मेळाव्यात काँग्रेसने आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. मंचावरून काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने घोषणा केली की, यावेळी गडचिरोली नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल. कार्यक्रमात अॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, अजय कंकडालवार, समशेर खान पठाण, सतीश विधाते यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संपूर्ण मैदानात उत्साहाचा माहोल होता.
या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, गडचिरोलीत आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond