
रत्नागिरी, 27 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवगड येथील युथ फोरम आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनात देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘विविध परंपरा आणि धर्मातील व्यक्तीचित्रे’ हा विषय देण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी रहाटे यांनी तीन फूट बाय चार फूट आकारातील रांगोळीद्वारे उत्तर पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील अपातानी समाजातील वृद्ध महिलेची रांगोळी साकारली. या रांगोळीत त्या समाजाची पारंपरिक वेशभूषा, चेहऱ्यावरचे सांस्कृतिक टॅटू, कानातील विशेष मोठे दागिने आणि वैशिष्ट्यपूर्ण मुखरेषा यांचे सूक्ष्म आणि अत्यंत बारकाईने चित्रण करून त्यांनी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. रंगसंगती, सूक्ष्म रेषाकार आणि वास्तवदर्शी सादरीकरणामुळे रहाटे यांची रांगोळी या स्पर्धेत ठळकपणे उठून दिसली.
प्रथम क्रमांकासाठी त्यांना रोख १५,००० रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांतील अनेक कुशल रांगोळी कलाकारांनी सहभाग घेतला होता, मात्र विलास रहाटे यांच्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेत साकारलेल्या सर्व रांगोळ्यांचे प्रदर्शन २८ ऑक्टोबरपर्यंत देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलमध्ये खुले ठेवण्यात आले आहे. कलाप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या कलादर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी