
कोल्हापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे मंगळवार, २८ ऑक्टोबरला सकाळी १०.४५ वाजता लक्ष्मी विलास पॅलेस येथे उद्घाटन होत आहे. हे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होत असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. ही वाघनखे ३ मे २०२६ पर्यंत कोल्हापूर येथे असणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे कोल्हापूरवासियांसाठी खास पर्वणी असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथील शिवप्रेमींना पाहता येणार आहेत. या पैकी सातारा आणि नागपूर येथील त्यांचा प्रवास पूर्ण झाला असून पुढील सहा महिने ती कोल्हापूर येथे असणार आहेत. इंग्लंड येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधून आणण्यात आलेल्या या वाघनखांचे ‘शिवशस्रशौर्य’ हे वीरश्री जागवणारे प्रदर्शन महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. कोल्हापूर येथे होणार्या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपा आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आतमध्ये जाणार्या प्रत्येकाची पडताळणी करूनच सोडण्यात येणार असून सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी