
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था, छत्रपती संभाजीनगर “वर्धमान समर्पण” या मुख्य कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा प्रसंगी मंत्री आमदार उपस्थित होते.सर्व संस्थापक सदस्य, माजी पदाधिकारी, तसेच वर्षानुवर्षे संस्थेला आपले योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था भविष्यातही नवी उंची गाठेल, ग्रामीण ते शहरी अशा सर्व घटकांना आर्थिक सक्षमतेकडे नेईल, अशी मला खात्री आहे. असे मंत्री पाटील म्हणाले.
वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. “वर्धमान समर्पण” या भव्य, आधुनिक आणि सुशोभित इमारतीचे उद्घाटन आपण सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. ही केवळ इमारत नाही, तर मागील ३२ वर्षांच्या प्रामाणिक सेवेला आणि विश्वासार्ह कार्याला मिळालेलं यशाचं प्रतीक आहे. वर्धमान पतसंस्था स्थापनेपासूनच “सहकारातून समाजकारण” या ध्येयाने कार्यरत राहिली आहे. या तीन दशकांच्या प्रवासात संस्थेने अनेक आव्हाने स्वीकारली, परंतु प्रत्येक वेळी सभासदांच्या विश्वासावर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्ठेवर उभी राहून प्रगतीचा नवीन अध्याय लिहिला.
संस्थेची काही वैशिष्ट्ये सांगताना आपल्याला अभिमान वाटतो की ही संस्था संपूर्ण संगणकीकृत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा तत्परतेने पुरविते. ठेवीदारांचा विश्वास टिकवून ठेवत संस्था ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी माफक व्याजदरात विविध कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या आहेत मग ती गृहकर्ज योजना असो, वाहन कर्ज असो किंवा व्यवसायवाढीची मदत. सोने तारण कर्ज योजना अत्यंत झटपट, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने दिली जाते.
आपल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सची सुविधा ही आजच्या काळाची गरज ओळखून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये डिमांड ड्राफ्टची सोय देऊन संस्था सभासदांना राष्ट्रीय स्तरावर जोडते आहे. या सर्व सेवा आणि प्रगतीमागे एकच शक्ती आहे ती म्हणजे सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचारीवर्गाची निष्ठा. या नवीन इमारतीच्या रूपाने आपण केवळ भौतिक सुविधा उभारल्या नाहीत, तर एका नवीन युगाची सुरुवात केली आहे, असे मत व्यक्त केले.
प्रसंगी गुरुदेव १०८ उपाध्याय विरंजन सागरजी महाराज, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था अध्यक्ष काकासाहेब कोयटे, अध्यक्ष शांतीलाल तेजमल सिंगी, उपाध्यक्ष पद्माकरराव कदम देशमुख, पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis