शिवसेनेने इशारा देताच अनधिकृत नामफलकांवर परभणी मनपाची कारवाई
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील विविध चौकांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत नामफलकांविरोधात शिवसेनेने घेतलेल्या तीव्र भूमिकेला यश मिळाले आहे. शिवसेनेच्या निवेदनानंतर परभणी महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करत अनधिकृत फलक काढून टाकले. शहरा
शिवसेनेने इशारा देताच अनधिकृत नामफलकांवर मनपाची झटपट कारवाई


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील विविध चौकांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत नामफलकांविरोधात शिवसेनेने घेतलेल्या तीव्र भूमिकेला यश मिळाले आहे. शिवसेनेच्या निवेदनानंतर परभणी महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करत अनधिकृत फलक काढून टाकले.

शहरातील काही ठिकाणी व्यक्ती किंवा संस्थांकडून स्वतःहून चौकांना नावे देत फलक लावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना परभणी शहरतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात कब्रस्तान परिसरातील वसमत रोडवरील “अली कॉर्नर” हा फलक पूर्णपणे अनधिकृत असल्याचे नमूद करत तातडीने तो काढण्याची मागणी करण्यात आली होती.

या निवेदनावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महानगर प्रमुख माणिक पोंढे, शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटक संदीप जाधव, उपतालुका प्रमुख सुभाषराव गरुड, महादेव खुणे, रामदेव ओझा, मंगेश काटकर, अभिषेक वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या मागणीची दखल घेत महानगरपालिकेने संबंधित अनधिकृत फलक तत्काळ काढून टाकला. या वेगवान कारवाईबद्दल शिवसेना परभणी शहरतर्फे मनपाचे आभार मानण्यात आले.

या संदर्भात जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व अनधिकृत नामफलकांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवावी. तसेच भविष्यात कोणतीही व्यक्ती अथवा संस्था मनपाची परवानगी न घेता फलक लावणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande