
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा अपेक्षेप्रमाणे विक्रीसाठी आलेला नाही. सोलापूर बाजार समितीत ७५ गाड्या कांदा आला होता. दिवाळी सुट्ट्यांमुळे आवक कमीच होती, तरीदेखील भाव समाधानकारक नव्हता. शुक्रवारी प्रतिकिलो एक ते २५ रुपये दर मिळाला.सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत दरवर्षी ३८ ते ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजार समितीत येतो. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्थानिक कांद्याची आवक खूप असते. यंदा मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले. दुसरीकडे सलग २० ते २५ दिवस कांद्यात पाऊस साचून राहिल्याने वाढ खुंटली. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यातील कांदा डिसेंबरअखेर बाजारात येईल, अशी स्थिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड