
पुणे, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या इंद्रायणी आणि पवना नदीसुधार योजनेच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे.नदीसुधार योजनेबरोबरच दुसरीकडे १२० गावांत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आणि प्रक्रिया केंद्र उभारणे अशी दोन्ही कामे प्राधिकरणाकडून हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात दोन्ही प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत.नदीसुधार योजनेंतर्गत ‘पीएमआरडीए’ने हद्दीतील सुमारे ८७ किलोमीटर लांबीची इंद्रायणी, तर ३५ किलोमीटर लांबीचा पवना नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे ८९० कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. प्राधिकरणाकडून इंद्रायणी नदी प्रकल्पाचा सर्वंकष विकास आराखडा यापूर्वीच तयार करून राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु