
नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
- महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकिय पातळीवरील कामकाजाला वेग आला असून आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. चक्रानुकार पध्दतीने आरक्षण सोडत काढताना ही पहिलीच निवडणूक असेल, हे ध्यानात घेऊन कार्यवाही करण्याचीही सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.
चार सदस्यिय प्रभाग रचना राहणार आहे. चार सदस्यिय एकूण २९ तर तीन सदस्यिय तीन, असे प्रभाग ३१ प्रभाग आहेत. आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या जागा थेट आरक्षित होणार आहेत, त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप केले जाणार आहे. प्रारूप आरक्षण सोडत काढून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जागांचे आरक्षण सोडतीने निश्चित केले जाणार आहे. सोडतीत निघालेले आरक्षण नेमून दिलेल्या पध्दतीने प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त हकरती आणि सूचनांचे निराकरण करून अंतिम आरक्षणाची सूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द केली जाणार आहे. अशा प्रकारे प्रभाग निश्चिती केल्यानंतर लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गासाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
आयुक्तांवर सोपविली निवडणुकीची जबाबदारी
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची प्रभागाच्या एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक असेल त्या प्रभागापासून सुरूवात करून या जातीच्या जागा सर्वच प्रभागात आरक्षित केल्या जाणार आहेत. याचप्रमाणे अनुसूचित जमातीचेही आरक्षण निश्चित केले जाणार आहे. याप्रमाणे निश्चित झालेल्या आरक्षणास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेला महिला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित पाडली जाणार आहे. त्यानंतर आरक्षाचे करून नागरिकांसमोर सोडतीची प्रक्रिया पार प्रारूप प्रसिध्द केले जाणार असून त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निर्णय घेण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.
आठ वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १२२ पैकी ६२ जागा ह्या सर्वसाधारण होत्या. ३३ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर १८ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होत्या. नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होत्या. तर ६१ जागा महिलांसाठी होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV