
रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवसभर ऊन आणि सायंकाळी वादळी पावसाच्या सरींमुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले. कापलेले भातपीक शेतातच भिजल्याने त्याला कोंब फुटले असून पेंढा कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरांसाठी चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभाग, रेवस, हाशिवरे, माणकुळे, शिरवली, नारंगी, फोफेरी, पेढांबे, वाघ्रण, सातघर, लोणघर, कोपर, चरी, शहापूर, शहाबाज आणि पोयनाड परिसरात शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. चिखलात अडकलेले आणि पडलेले पीक कुजल्याने शेतकरी निराश आणि हताश झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हा प्रमुख कृष्णकांत पाटील यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना या संदर्भात लेखी निवेदन देण्याचे सांगितले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून, रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरसकट पंचनामे करून विशेष हेक्टरी मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक एका झटक्यात पाण्यात गेली असून, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी चालू पीककर्ज माफ करून नवी मदत योजना तातडीने राबवावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके