
- उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शेती, खाद्य प्रक्रिया आदी क्षेत्रांत प्रशिक्षण उपक्रम सुरू
नागपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. बार्टी राज्यातील अनुसूचित जातींच्या युवक-युवतींना प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या या कार्यक्रमामुळे अनेक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
या उपक्रमाचा उद्देश युवकांना व्यावसायिक, तांत्रिक आणि उद्योजकतेच्या कौशल्यांनी सक्षम करणे हा आहे. त्यामुळे ते रोजगाराच्या संधी मिळवू शकतील किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतील. या प्रशिक्षणा अंतर्गत युवकांना उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, हातमाग, शेती, खाद्य प्रक्रिया यांसारख्या विविध क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जात आहे.
बार्टीच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाला राज्यातील अनेक नामांकित प्रशिक्षण भागीदारांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामध्ये सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, ब्राईट फ्युचर इंडिया, स्किल टेक साई सर्व्हिस फाउंडेशन, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), इंडो-जर्मन टुल रूम (IGTR), टेक महिंद्रा स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअर, खादीग्राम उद्योग महामंडळ, टाटा स्ट्राईव्ह आदी संस्थांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणामुळे अनेक युवकांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. काहींनी लघुउद्योग सुरू केले, तर काहींनी खाद्य प्रक्रिया, संगणक तंत्रज्ञान, हस्तकला, पर्यटन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात रोजगार मिळवला आहे. बार्टीच्या या प्रयत्नांमुळे युवकांमध्ये सामाजिक जागरूकता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होत असून, समाजाच्या प्रगतीत ते सक्रियपणे योगदान देत आहेत. या माध्यमातून सामाजिक समरसता आणि आर्थिक प्रगतीस चालना मिळत आहे. बार्टीच्या प्रशिक्षण योजनांची माहिती आणि प्रवेशप्रक्रिया बार्टीच्या https://www.barti.in/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण व कौशल्यविकासाच्या विचारांना मूर्त रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक युवकाला त्याच्या क्षमतेनुसार योग्य प्रशिक्षण मिळावे, हा आमचा उद्देश आहे. या उपक्रमात सामाजिक न्याय विभागाचे मार्गदर्शन, तसेच प्रशिक्षण भागीदार व प्रशिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. या संयुक्त प्रयत्नातून राज्यातील अनुसूचित जातींचे युवक अधिक सक्षम, स्वावलंबी आणि सशक्त समाजनिर्मितीकडे वाटचाल करीत असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्याकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी