
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हमी भाव मिळत नसल्याने बाजारपेठेत शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. आधीच उसनवारीने दिवाळी सण साजरा केल्यानंतर आता रब्बीसाठी शासकीय मदत निधी मिळत नसल्याने मिळेल त्या दरानेच सोयाबीन विक्री करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन कमी दरानेच विक्री केली. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरु झालेली नाही. त्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. अतिवृष्टीने पिकांत पाणी साचून राहिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. एका बाजूला निसर्गाचा रौद्रावतार, तर दुसन्या बाजुला बाजारपेठेतील मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हमीभावाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाने मात्र अद्याप हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली नाहीत. त्यामुळे सोयाबीन कमी किंमतीत खरेदी करून शेतकयांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड