जळगाव : सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन
जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : चोपडा व यावल तालुके इतर तालुक्यांप्रमाणेच दुष्काळग्रस्त घोषित होण्यास पात्र असूनही शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीतून वगळले गेले, ही अन्यायकारक बाब तातडीने दुरुस्त करून या तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी शेतकरी कृती सम
जळगाव : सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन


जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : चोपडा व यावल तालुके इतर तालुक्यांप्रमाणेच दुष्काळग्रस्त घोषित होण्यास पात्र असूनही शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीतून वगळले गेले, ही अन्यायकारक बाब तातडीने दुरुस्त करून या तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी शेतकरी कृती समिती व स्थानिक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केळी, कापूस पिकाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी आज दि. 27 रोजी जळजाव चौफुलीवर रास्तारोका आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून चोपडा-यावल भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, पिकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. एकेकाळी कापसाचे उत्पादन प्रति एकर 7 ते 8 क्विंटल असायचे; मात्र आता ते केवळ 2 ते 2.5 क्विंटलवर आले आहे. उत्पादन निम्म्यावर आले, पण खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत व वाहतूक खर्च तिप्पट वाढले. सरकारची किमान आधारभूत किंमतही पुरेशी वाढलेली नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कापसाला सध्या बाजारात भाव मिळत नाही. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शिक्षण, आरोग्य, वीज बिल, मायक्रो फायनान्सचे कर्ज, आणि मुलांच्या लग्नखर्चामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.

चोपडा, यावल तालुक्यांना वगळल्यामुळे दुष्काळात शेतकरी होरपळत आहे. निवेदनावर एस.बी. पाटील, अजित पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी जळगाव चौफुलीवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत रास्तारोको आंदोलन केल्याने यावल, चोपडा, जळगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. केळीचे घड घेवून शेतकरी आंदोलन स्थळी दाखल झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande