
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)शहरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाने पाच कोटींचा विशेष निधी शहर मध्य मतदारसंघातील १७ रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील रस्ते सुधारण्यावर महापालिकेने भर दिला आहे.दोन महिन्यांपूर्वी शहरासाठी स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत ४० कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातील ३५ कोटी निधीतून रस्ते केले जाणार आहेत. आता पुन्हा शहर मध्यमधील १७ रस्त्यांच्या कामासाठी ५ कोटींचा विशेष निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील धूळमुक्त योजनेला हातभार लागणार आहे.तीन वर्षांत शहरात १५० कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले. या कामांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा केला. मात्र यंदाच्या पावसाने प्रशासनातील अधिकाऱ्यांसह, मक्तेदार, लोकप्रतिनिधी यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड