
नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
दक्षिणेची काशी असलेल्या गोदावरी नदीकिनारी उत्तर भारतीय बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जाणाच्या छटपूजेनिमित्त सोमवारी ( 27,)सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मनोभावे छट मातेचे पूजन केले. भाविकांनी सोबत आणलेल्या पूजा सामग्रीने पूजाअर्चा व आरती केल्यानंतर भाविक आपल्या घरी जाण्यासाठी माघारी फिरत होते. तर व्रतस्थ भाविक रात्रभर नदीपात्रात उभे राहून मंगळवारी (28) सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर व्रताची विधिवत सांगता केली जाणार आहे.
दिवाळी सण साजरा केल्यानंतर कार्तिक चतुर्थीच्या दिवशी उत्तर भारतीय बांधवांच्या छटपूजेस प्रारंभहोतो. पहिल्या दिवशी नहाय-खाय, दसऱ्या दिवशी खरना, तिसऱ्या दिवशी सूर्यास्त समयी सूर्याला पहिले अर्घ्य देऊन चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर या व्रताची सांगता होत असते. उत्तर भारतीय बांधवांच्या घरोघरी शनिवारी (दि.2५) नहाय-खाय अर्थात मन व शरीराची शुद्धी करण्यात येऊन छटपूजेस प्रारंभ झाला. सात्विक आहार घेऊन या उत्सवाची सुरुवात होत असते. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.26) खरना म्हणजे व्रतस्थ महिला व पुरुषांनी निर्जला उपवास करीत मनोभावे छटमातेचे पूजन केले. कार्तिक शुद्ध षष्ठी अर्थात सोमवारी ( दि. 27)सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर गोदापात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करण्यातआली. सूर्य अस्ताला गेल्यावर अध्य देऊन याठिकाणी मांडण्यात आलेली पूजासामग्रीची मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी नदीपात्रात उसाचे तोरण उभारून जवळच टोपली व सूप यामध्ये विविध प्रकारचे फळं ठेवून व धूप दीप लावून मनोभावे पूजन करण्यात आले. आरती करून झाल्यावर अनेक भाविकांनी घरची वाट धरली. तर जे व्रतस्थ महिला-पुरुष होते ते रात्रभर नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे होते.
दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजेनंतर उत्तर भारतीय बांधवांची गर्दी गोदाघाटावर वाढण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रामकुंडासह लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, धनुष कुंड, सीता कुंड, दुतोंड्या मारुती जवळील नदीपात्रापासून गाडगे महाराज पुलापर्यंत उत्तर भारतीय बांधवांनी छटपूजेसाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने रामकुंडावर गांधी तलावाजवळ गणराज सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भोजपुरी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदा झा होते. तर उद्योजक व निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते. यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज, गणराज सेवाभावी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे उमापती ओझा, हिरालाल परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
छटपूजेनिमित्त जिल्ह्यासह विविध भागातून उत्तर भारतीय महिला तसेच पुरुष गोदाकाठी छटपूजा करण्यासाठी हजेरी लावतात. मोठ्या प्रमाणात महिला येत असल्याने त्यांच्यासाठी यावर्षी उत्तर भारतीय बांधवांच्या संस्थांतर्फे तात्पुरत्या वस्त्रांतरगृहाची व्यवस्था करण्यात आल्याने
महिलांनीदेखील समाधान व्यक्त केले.
वर्षीच्या छठ समितीचे अध्यक्ष गोविंद झा असून संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा आहेत.कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती मनीष मिश्रा यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्तप्रविण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आमदार अँड राहुल ढिकले आमदार सीमाताई हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप स्वामी संविदांनंद सरस्वती, महंत भक्तीचरनदास
माजी उपमहापौर गुरमीत बग्गा गारगोटी संग्रहालयाचे संचालक के.सी.पांडे पोलीस निरीक्षक . गजेंद्र पाटील किशोर बेलसरे,
तसेच भुआल सिंह, रावसाहेब कोशिरे, प्रदीप पेशकर , श्रीलाल पाण्डेय, दिगंबर धूमल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी पार पडण्यासाठी हिरालाल परदेशी, सुभाष अग्रहरी, प्रकाश चौहान, श्याम विश्वकर्मा, रवी सोनार, जयकृष्ण दवे आणि अयोध्या यादव प्रयत्नशील आहेत.
छटपूजेच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार झाला यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सूर्याची पूजा करण्याच्या वेळेतच हा प्रकार झाल्यामुळे या परिसरात भीतीची छाया निर्माण झाली होती परंतु तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV