
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत नुकतेच घोषित करण्यात आलेले 29 नवीन हॉकर्स झोन पूर्णपणे चुकीचे असून ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शहरातील पथ विक्रेत्यांनी केली आहे.या संदर्भात गणेश मारोडकर (जिल्हाध्यक्ष), दीपक लोखंडे (जिल्हा उपाध्यक्ष) आणि सुरज चढार (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखालील पथ विक्रेता प्रतिनिधींनी मा. आयुक्त तथा अध्यक्ष, पथ विक्रेता समिती, अमरावती महानगरपालिका यांना निवेदन दिले.
पथ विक्रेत्यांनी सांगितले की, 2017 मधील पथ विक्रेता योजना उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे, त्यामुळे त्या आधारे तयार करण्यात आलेले झोन अमान्य आहेत. समितीच्या सहमतीने सादर केलेल्या योजनेलाच शासनमान्यता द्यावी व त्यानुसार शहरातील अस्तित्वात असलेल्या आणि आवश्यक ठिकाणी झोन तयार करावेत, अशी त्यांची मागणी आहे.तसेच 9 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी 29 झोनना विरोध दर्शविला असूनही महानगरपालिकेने हे झोन जाहीर केल्याने विक्रेत्यांच्या अधिकारांचे हनन झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पथ विक्रेत्यांनी इशारा दिला आहे की, जर हे अन्यायकारक झोन रद्द केले नाहीत, तर हजारो हॉकर्स व्यावसायिक महानगरपालिकेसमोर मोठे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी