विज्ञान, अध्यात्म आणि कर्मयोगाची सांगड हाच प्रगतीचा मंत्र — डॉ. विशाल सरदेशपांडे
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.) सरदेशपांडे हुरडा पार्टीतर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना डॉ. विशाल सरदेशपांडे यांनी विज्ञान, अध्यात्म आणि कर्मयोग यांची सांगडच ही खरी प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केल
8f19fb377cb446eb0ef78eb80991e334_123320915.jpg


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.) सरदेशपांडे हुरडा पार्टीतर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना डॉ. विशाल सरदेशपांडे यांनी विज्ञान, अध्यात्म आणि कर्मयोग यांची सांगडच ही खरी प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ. सरदेशपांडे हे आयआयटी पवई, मुंबई येथील प्राध्यापक असून शेतीपूरक रसायनमुक्त गुळ उत्पादन तंत्रज्ञानाचे उद्योजक आहेत. त्यांचे शिक्षण आयआयटी मुंबई आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ (यूके) येथे झाले आहे. त्यांच्या पत्नी डॉ. माधवी सरदेशपांडे ह्याही आयआयटी मुंबई येथून उच्च शिक्षित असून गुळ उद्योगाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात. पुणे व मुंबई येथे वास्तव्य असूनही परभणीतील वारकरी व शेतकरी कुटुंबातील मुळ नाळ त्यांनी टिकवून ठेवली आहे.

डॉ. सरदेशपांडे यांनी कीर्तनाची सुरुवात विज्ञान आणि अध्यात्म यांची व्याख्या स्पष्ट करून केली. “विज्ञान बाह्य जगाचा अभ्यास करतं — निसर्गाचे नियम, उष्णता, पदार्थ आणि ऊर्जा समजून घेतं; तर अध्यात्म अंतर्मनाचा शोध घेतं — विचार, भावना, चेतना आणि आत्म्याचा प्रवास घडवतो,” असे ते म्हणाले.

यानंतर त्यांनी मनाला बांधून ठेवणारे सहा शत्रू — काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा उल्लेख करत, हेच मानवाच्या प्रगतीच्या मार्गातील खरे अडथळे असल्याचे सांगितले. या प्रत्येक दोषाचे उदाहरण त्यांनी पौराणिक कथा, राजकारण आणि दैनंदिन जीवनातील घटनांमधून दिले.

ते म्हणाले, “मन शुद्ध ठेवण्यासाठी यम आणि नियम या दहा नैतिक नियमांचे पालन आवश्यक आहे.” यम म्हणजे समाजात इतरांशी वागण्याचे आचार — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह; तर नियम म्हणजे अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे पालन. “कर्मयोग म्हणजे आपल्या कर्तव्याचे भक्तिभावाने, पण फळाच्या अपेक्षेशिवाय पालन करणं,” असे सांगत त्यांनी उदाहरण दिलं की, जेव्हा आपण परिणामाचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून कार्य करतो, तेव्हा मन निर्मळ राहते आणि कृती पवित्र होते.

रसायनमुक्त गुळाच्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या त्यांच्या प्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी म्हटले “सुरुवातीला परिणामाची घाई, चिंता आणि दडपण होतं. पण विपश्यना ध्यान आणि कर्मयोग आचरणात आणल्यानंतर मी फक्त प्रयोगावर लक्ष केंद्रित केलं, परिणामावर नाही — आणि तेव्हाच यश मिळालं!”

त्यांनी निष्कर्ष काढला — “विज्ञान आणि अध्यात्म एकत्र चालू शकतात.”

कीर्तनाच्या शेवटी त्यांनी एक प्रेरणादायी विचार मांडला “विज्ञान आपल्याला शक्ती देते, आणि अध्यात्म त्या शक्तीला दिशा देते.”

“विज्ञान विचारतं — ‘हे कसं करायचं?’ आणि अध्यात्म विचारतं — ‘हे का करायचं?’” प्रत्येक उद्योजक हा कर्मयोगीच असतो, असं सांगत त्यांनी म्हटलं “जो मनापासून कार्य करतो, अडचणींना सामोरा जातो आणि फळाच्या आसक्तीशिवाय ध्येयाकडे वाटचाल करतो, तोच खरा कर्मयोगी.” आपल्या वारकरी परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “आजपर्यंत जे काही साध्य झालं आहे ते पांडुरंगाच्या कृपेनेच.” या कीर्तन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक भक्त मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन सरदेशपांडे हुरडा पार्टीतर्फे करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande