परभणी - पाथरी शहरातील नागरी समस्यांचे तातडीने निवारण करा — आ. विटेकर
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। पाथरी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या कामासाठ
3b6850ab24e291b1e4d552e525a6dd01_1185845656.jpg


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। पाथरी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या कामासाठी दलालांच्या माध्यमातून निर्माण झालेली संस्कृती तात्काळ थांबवावी, असा ठाम इशारा आमदार राजेश विटेकर यांनी प्रशासनाला दिला. पाथरी नगरपरिषद सभागृहात आयोजित नागरी समस्या निवारण बैठकीत आमदार विटेकर बोलत होते.या बैठकीस उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद प्रशासक सौ. संगीता चव्हाण, मुख्याधिकारी युवराज पौळ, महावितरणचे श्री. डिग्रसकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, तहसीलदार हांदेश्वर यांच्यासह शहरातील नागरिक व विविध भागांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांनी विविध भागांतील समस्या मांडल्या. रशीद कॉलनी, गणेशनगर, उल्हासनगर, शाहूनगर, शिवाजीनगर आणि भीमनगर या भागांतील घरांवरून उच्च दाब वाहिन्या जात असल्यामुळे अनेक अपघात झाले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार करण्यात आली. यावर तात्काळ प्रतिक्रिया देत आमदार विटेकर यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करून दोन दिवसांच्या आत हे काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील विद्युत तारा, पथदिवे व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना दिल्या. नामदेव नगर, इंदिरानगर आणि हनुमान नगर या वसाहतीतील नागरिकांना घरांचे मालकी हक्क प्रमाणपत्र (पीटीआर) देण्यात यावेत, तसेच नवीन घरकुल मंजूर करण्याच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे आमदारांनी प्रशासनाला निर्देश दिले. तसेच घरकुलांचे थकीत हप्ते, बांधकाम कामगारांची नोंदणी आणि शहर स्वच्छतेच्या कामांतील उशीर यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “शहरातील नाल्यांवरील ढापे, पथदिवे आणि स्वच्छता कामे तात्काळ पूर्ण व्हावीत,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

बैठकीत नागरिकांनी सांगितले की, नगरपरिषद, तहसील कार्यालय, जिल्हा बँक आदी कार्यालयांमध्ये दलालांशिवाय काम होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना थेट काम न करता दलालांकडे पाठवतात, अशी तक्रार उपस्थितांनी मांडली. या तक्रारींवर आमदार विटेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत “असे अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर काटेकोर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करा,” अशा सूचना उपविभागीय अधिकारी सौ. संगीता चव्हाण यांना दिल्या. “नागरिकांची अडवणूक प्रशासनाने अजिबात सहन केली जाणार नाही. लोकांच्या प्रश्नांना गांभीर्याने हाताळले नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होईल,” असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीस सुमारे चारशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. शहरातील विविध भागांतील कार्यकर्ते आणि नागरिक प्रतिनिधींनी आपल्या सूचना दिल्या. त्यामध्ये संजय कुलकर्णी, शाकीरभाई सिद्दीकी, वली पाशा कुरेशी, वाजेद बेग, फैसल चाऊस, सुधाकर बिडकर, अनंत नेब, कृष्णा गिराम, विठ्ठल थोरात, चंद्रकांत हरकळ, खदीरबापू, चंद्रसिंग नाईक आदींचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande