
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास पदस्पर्श सुरू झाले आहे. दरम्यान आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा झाली. त्यानंतर देवाच्या शेज घरातील पलंग काढून विठुरायाला लोड देण्यात आला तर रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात आला. ९ नोव्हेंबरपर्यंत (प्रक्षाळ पूजा) देवाचे सर्व राजोपचार बंद राहणार आहेत. कार्तिक यात्रेच्या सोहळ्याची मंदिर समितीने तयारी पूर्ण केल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.२ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी किमान पाच ते सहा लाख भाविक येतील असा अंदाज आहे. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी दहा पत्रा शेड तयार करण्यात आले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाश्ता मंदिर समिती देणार आहे. आतापासूनच दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद चालविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड