स्वातंत्र्यवीर सावरकरांइतकेच त्यांच्या परिवारातील स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे - डॉ. शुभा साठे
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर सावरकरांइतकेच त्यांच्या परिवारातील स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्यागाशिवाय सावरकरांचे राष्ट्रकार्य शक्य झाले नसते, असे मत नागपूर येथील सावरकर जीवनचरित्रावर विद्यावाचस्पती पदवीप्राप्त आ
स्वातंत्र्यवीर सावरकरांइतकेच त्यांच्या परिवारातील स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे  ः डॉ. शुभा साठे यांचे प्रतिपादन : परभणीत ‘त्या तिघी’ विषयावर व्याख्यान


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

स्वातंत्र्यवीर सावरकरांइतकेच त्यांच्या परिवारातील स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्यागाशिवाय सावरकरांचे राष्ट्रकार्य शक्य झाले नसते, असे मत नागपूर येथील सावरकर जीवनचरित्रावर विद्यावाचस्पती पदवीप्राप्त आणि प्रसिद्ध वक्त्या डॉ. शुभा साठे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन परभणी संचलित स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळातर्फे श्री पार्वती मंगल कार्यालयात ‘त्या तिघी’ या विषयावर डॉ. शुभा साठे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सावरकर बंधूंच्या अर्धांगिनी - येसूवहिनी, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर यांच्या अद्भुत त्याग, धैर्य आणि देशभक्तीचा हृदयस्पर्शी प्रवास आपल्या ओघवत्या भाषेत मांडला.

व्याख्यानाच्या प्रारंभी सावरकर कुटुंबातील स्त्रियांच्या व्यथा, संघर्ष आणि त्यांच्या अढळ देशभक्तीबद्दल बोलताना डॉ. साठे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांइतकेच त्यांच्या परिवारातील स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या त्यागाशिवाय सावरकरांचे राष्ट्रकार्य शक्य झाले नसते. सावरकर कुटुंबातील स्त्रिया फक्त सहधर्मचारिणी नव्हत्या, तर त्या संघर्षाच्या काळातील सहयोद्ध्या होत्या. स्वा. नारायणराव सावरकरांच्या पत्नी हरिदिनीबाई उपाख्य शांताबाई यांच्या त्यागाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, तृतीय सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस यांनी नागपूरच्या कार्यक्रमात शांताबाई सावरकरांना जाहीरपणे साष्टांग नमस्कार केला होता, हा प्रसंग सांगितला. स्वातंत्र्यानंतरही सावरकर घराण्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करताना त्यांनी नमूद केले की, स्वतंत्र भारतात विनाकारण दोनदा अटक झालेले स्वातंत्र्यवीर हे जगातील दुर्मिळ उदाहरण आहे. या अन्यायाचे परिमार्जन आपण केव्हा आणि कसे करणार? असा सवाल उपस्थित करून त्यांनी सावरकर घराण्याच्या पुनर्मूल्यांकनाची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कै. आबासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उत्थान गुरुकुलम् फाउंडेशन परभणीच्या 11 बालकांनी आचार्य अविनाश गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले सावरकरांचे ‘स्वतंत्रते भगवती’ हे स्तवन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी करताना मंडळाच्या गेल्या चार दशकांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पुणे तर्फे प्रकाशित ‘क्रांतीपुष्प 2026’ या दिनदर्शिकेचे उद्घाटन डॉ. शुभा साठे यांच्या हस्ते आणि संस्थेचे सचिव श्री कृष्णा वैद्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यंदा माजी कोषाध्यक्ष श्री रमेशराव कौसडीकर यांचा सपत्नीक सत्कार झाला. तसेच कार्यक्रम स्थळाचे मालक श्री प्रभाकरराव देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वीर सावरकर विचार मंचाचे सचिव डॉ. नवीनचंद्र मोरे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंदमान सहलीसाठी होणार्‍या वक्तृत्व स्पर्धेची माहिती दिली. सौ. सुमेधा कुलकर्णी, गिरीश पिंपळगावकर, अविनाश गोहाड यांनी अनुक्रमे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व सन्मानित व्यक्तींचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन सौ. संजीवनी खोत यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद पावगी यांनी केले.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सौ. अपर्णा मानोलीकर जहागिरदार यांनी ‘त्या तिघी’ या विषयावर साकारलेली अप्रतिम रांगोळी. कार्यक्रमाच्या शेवटी आकाशवाणी निवेदिका सौ. मोहिनी कुलकर्णी यांच्या ‘वंदे मातरम’ने सभागृह राष्ट्रभावनेने भारून गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande