
मुंबई, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। राजधानी मुंबईसह राज्यातील परिवहन सेवा अधिक गतीमान आणि अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील 150 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकारने एसटीच्या ताफ्यात 5000 नव्या बसगाड्या आणण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 157 इलेक्ट्रिक बस आज प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या सर्व बसगाड्या मुंबईतील 21 मार्गांवर धावणार असून, सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज या सेवांचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या मिळाल्या पाहिजेत आणि प्रदूषणही कमी झाले पाहिजे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांचा विस्तार महत्त्वाचा आहे. बेस्टची सेवा ही एकप्रकारे मुंबईची जीवनवाहिनी आहे. कर्मचारी समाधानी असतील तरच सेवा उत्कृष्ट होईल, हे आमचे तत्त्व आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, बेस्टसाठी ‘सिंगल तिकीट’ व्यवस्था आणि ‘नॉन फेअर बॉक्स’ उत्पन्न यांसारख्या उपाययोजनांमुळे या सेवेला अधिक बळकटी मिळेल.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) मार्फत प्रवर्तित करण्यात आलेल्या या 150 इलेक्ट्रिक बसगाड्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्या ‘वेट लीज’ पद्धतीने चालवल्या जाणार आहेत. यापैकी 115 बसगाड्या PMI इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. मार्फत संचलित केल्या जातील, तर उर्वरित 35 बस ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. कंपनीच्या असून त्यांचे संचालन ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. यांच्याकडे असेल. ओशिवरा, आणिक, कुर्ला आणि गोराई येथील डेपोमधून या बससेवा सुरू होतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी या बसगाड्यांमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सुविधा देण्यात आली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, बांद्रा, कांदिवली आणि बोरिवली अशा उपनगरी रेल्वे स्थानकांना या बससेवेच्या माध्यमातून मेट्रो लाईन क्रमांक 1, 2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) शी थेट जोडणी मिळणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना अखंड ‘लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी’ मिळून प्रवास अधिक सुलभ होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule