
रायगड, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। म्हसळा शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटनेत मोठा फेरबदल करण्यात आला असून, कट्टर व कार्यक्षम शिवसैनिक अभय कलमकर यांची म्हसळा शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली असल्याचे समजते.
गेल्या दोन दशकांपासून अभय कलमकर हे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षाच्या विविध स्तरांवर सक्रिय राहिले आहेत. संघटनबांधणी, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा या तीन आघाड्यांवर त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या पत्नी या म्हसळा शहराच्या माजी सरपंच असून, दोघांनीही स्थानिक समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कलमकर यांच्या निवडीमुळे म्हसळा शहरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. पक्षसंघटनेत नव्या नेतृत्वामुळे नव्या रणनीतीची व कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर या बदलामुळे चर्चेला उधाण आले असून, “म्हसळा शहराला नव्या दमाचे नेतृत्व लाभले आहे,” असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
निवडीबाबत प्रतिक्रिया देताना अभय कलमकर म्हणाले,
“एक शिवसैनिक म्हणून मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. शहरातील संघटना बळकट करून आगामी म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार मी केला आहे.” अभय कलमकर यांच्या निवडीमुळे म्हसळा शहरातील शिवसेना संघटनेत नवे ऊर्जित आणि एकसंघ नेतृत्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके