दोन वर्षांनंतर सफाई ठेक्याला मुहूर्त; शंभर कोटींचा खर्च
नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : अनेक कारणाने वादात सापडलेल्या मनपाच्या सफाई ठेक्याची प्रक्रिया अखेर दोन वर्षांनी पार पडली आहे. घनकचरा विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. ठेक्याची ४०, ३५ व २५ टक्के याप्रमाणे विभाग
दोन वर्षांनंतर सफाई ठेक्याला मुहूर्त शंभर कोटींचा खर्च : आऊटसोर्सिंगद्वारे सफाई काम


नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : अनेक कारणाने वादात सापडलेल्या मनपाच्या सफाई ठेक्याची प्रक्रिया अखेर दोन वर्षांनी पार पडली आहे. घनकचरा विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. ठेक्याची ४०, ३५ व २५ टक्के याप्रमाणे विभागणी केली आहे. ८७५ कर्मचाऱ्यांद्वारे ३ वर्ष नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील सफाई काम आऊटसोर्सिंगद्वारे केले जाणार आहे. याकरिता नाशिक महानगरपालिका १०३ कोटींचा खर्च करणार आहे.

दरम्यान यापूर्वी सफाई ठेक्यातील मनुष्यबळ संख्या ११७५ करण्यात आली होती. तसेच ३ वर्षाचा कालावधी थेट ५ वर्षाचा करून ७३ कोटींहून थेट २३७ कोटींवर सफाईचे काम नेण्यात आले होते. नंतर प्रशासनाला उपरती आल्यानंतर या ठेक्यात काट-छाट करून तो १०० कोटींवर आणण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये सफाई ठेक्याची मुदत संपुष्टात आली होती. मात्र शिक्षक, पदवीधर, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमुळे सफाई ठेक्याचे घोडे अडले होते. परिणामी आधीच्या ठेकेदाराला मुदतवाढ देऊन त्याच्याकडून कामे करुन घेतली जात होती. आतापर्यंत विद्यमान ठेकेदाराला सातवेळा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी दोनदा निविदा प्रक्रिया रद्द झाली असून, तिस-यांदा प्रशासनाकडून सफाई ठेक्याची प्रक्रिया राबवण्यात आली. गंगा, गोदावरी घाट, गौरी पटांगण, अहिल्याबाई होळकर पूल ते कपिला संगम, पूर्व विभागातील पालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालये, आस्थापना, विभागीय कार्यालय, मनपाची नाट्यगृहे, सभागृहे, जलतरण तलाव, नाशिक पश्चिम विभाग, पंचवटी व घाटालगतचा भाग आदी ठिकाणांची साफ-सफाई केली जाणार आहे. नवीन सफाई ठेक्यात महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालनासह मनपाची सर्व नाट्यगृहे सभागृहे ८२ स्वच्छता गृहे, १२ जलतरण तलाव असे एकूण ९४ मनुष्यबळ व मनपा शाळांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकरिता एकूण ८१ मनुष्यबळ यानुसार एकूण १७५ मनुष्यबळ या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande