
जळगाव, 28 ऑक्टोबर (हिं.स.) बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रहिवासी आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच २३ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात डॉक्टरवर अत्याचार आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली असून, त्यात तिच्यावर चार वेळा अत्याचार झाल्याचे आणि मानसिक त्रास दिला गेल्याचे नमूद केले आहे. तिचे वडील अत्यंत गरीब शेतकरी असून, या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात संबंधितांना शिक्षा व्हावी, तसेच मृत डॉक्टरच्या कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक आधार मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील, शिवप्रेरणा संस्थेच्या अध्यक्षा मिना बाग, सचिव मनिषा पाटील, सदस्या रेखा शिरसाठ आदी महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शितल सोलाट आणि पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन दिले. महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जर नोकरी करणाऱ्या महिला डॉक्टरही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य महिलांचे काय?” असा प्रश्न उपस्थित करत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर