अमरावती -उदखेड येथे शेतकरी पुत्राला 33 केव्ही विजेचा धक्का
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.)उदखेड येथे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने स्वतः दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला 33 केव्ही लाईनचा जबर विजेचा धक्का बसल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी हानी टळली असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ती
उदखेड येथे शेतकरी पुत्राला 33 केव्ही विजेचा धक्का – महावितरणच्या भोंगळ कारभारावर शेतकऱ्यांचा संताप


अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.)उदखेड येथे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने स्वतः दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला 33 केव्ही लाईनचा जबर विजेचा धक्का बसल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी हानी टळली असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अंबाडा–डोमक फिटरवरील विजेच्या पोलवर झाडे, झुडपे आणि वेल वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कळविले, मात्र कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अधिकारी फोनवर संपर्क साधण्यासही टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.वीजपुरवठा खंडित झाल्याने उदखेड येथील अक्षय राजेंद्र पोहकार हा स्वतः लाईन दुरुस्ती करण्यासाठी गेला असता, त्याला 33 केव्ही वीजेचा जबर धक्का बसला. काही वेळ तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडून होता. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ त्याला मोर्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. उपस्थित अधिकाऱ्यांनी पुढील आठ दिवसांत सर्व दुरुस्ती करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची हमी दिली.शेतकऱ्यांच्या मते, महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande