
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला.या बैठकीत प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नांदेड जिल्हा हा शेतीप्रधान प्रदेश असून सिंचनाच्या सोयीसाठी सुरू असलेली ही सर्व कामं पूर्ण झाल्यास परिसरातील शेती, अर्थव्यवस्था आणि रोजगार यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही. या बैठकीच्या दरम्यान लोअर मानार प्रकल्पाच्या कॅनॉल लाईनिंगचं तसंच विष्णुपूरी प्रकल्पाच्या मारतळा भागातील कॅनॉल लाईनिंगचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
जायकवाडी प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत धोंड प्रकल्पासाठी आवश्यक निधी लवकर उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. अंतेश्वर येथील बंधाऱ्यातून लोहा मार्गे लिफ्टद्वारे अहमदपूर (जि. लातूर) येथे देण्यात येणाऱ्या पाण्यापैकी लोहा परिसरालाही नियमित पाणीपुरवठा सुरू रहावा, याबाबत ठोस चर्चा झाली.
त्याचप्रमाणे बैठकीत शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या अंतर्गत डेरला व किवळा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी कामाला आवश्यक गती देण्याबाबत चर्चा झाली. सोबतच कंधार तालुक्यातील चिखली–हाळदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर अप्पर पैनगंगा कालव्याच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी लवकरात लवकर मिळवून ही कामं पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. सोबतच लेंडी आंतरराज्य (धरण) प्रधान प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन तसंच पुनर्वसित गावांतील विकासकामं लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.या सर्व प्रकल्पांमुळे नांदेड, लातूर आणि मराठवाडा विभागातील हजारो शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा लाभ होईल. जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पाला गती देणं आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करणं, हीच आपल्या सरकारची मुख्य भूमिका आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis