
जळगाव, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकत असून, दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही निवडणूक रखडलेली असल्याने इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये आता चैतन्य निर्माण झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबरला आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रांत प्रसिद्ध केली जाईल.
११ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष आरक्षण सोडत पार पडून त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सूचना मागविण्याची अधिसूचना प्रसिद्ध होईल. २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत दिली जाईल. प्राप्त झालेल्या सर्व हरकतींवर २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत मनपा आयुक्त निर्णय घेतील. अखेरीस २ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षणाचा नमुना शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाविषयीच्या सूचनांची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मनपा आयुक्तांना दिली असून, निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर