
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : छटपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आपल्या आस्थेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. या पूजेद्वारे तुम्ही भारतीय संस्कृती पुढे नेत आहात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू येथे आयोजित छटपूजेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिंदे यांनी उत्तर भारतीय बांधवांना बिहारी भाषेत छटपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
शिंदे म्हणाले, “छटपूजा ही सामाजिक एकता आणि बंधुतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. ठाणे, मुंबईसह राज्यभरात छटपूजेचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे. संजय निरुपम यांचे विशेष कौतुक करतो, कारण ते मागील 28 वर्षांपासून या पूजेचे आयोजन करत आहेत.”
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “सर्व माता-भगिनी आपल्या कुटुंबासाठी सूर्यदेवाचे व्रत करतात. सामान्यतः उगवत्या सूर्याची पूजा केली जाते, परंतु तुम्ही उगवत्या आणि मावळत्या दोन्ही सूर्याची पूजा करता, हे अत्यंत उल्लेखनीय आहे. छटपूजा हे केवळ व्रत नसून देवीच्या शक्तीचे प्रमाण आहे.”
कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, “छटमातेच्या आणि सूर्यदेवाच्या समोर सर्व समान असतात. महाराष्ट्रात विविध संस्कृतीचे लोक एकोप्याने राहतात. पूजेसाठी काही ठिकाणी कृत्रिम तलावही उभारण्यात आले आहेत.”
शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना सर्व सणांवरील निर्बंध हटवले. भारताला महासत्ता बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. मोदीजींना पाठिंबा देण्याचा संकल्प करूया. संजय निरुपम यांच्या नेतृत्वात आम्ही बिहार निवडणुकीत सभाही घेणार आहोत.”
मुंबईच्या विकासाबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, “पुढील दीड वर्षांत मुंबईचा कायापालट होणार आहे. सुरू असलेली विविध विकासकामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करू.”
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “ही योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. ती कधीच बंद होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. महायुती सरकारने घेतलेले सर्व कल्याणकारी निर्णय सुरूच राहतील,” असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर