
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कर्जत संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि नगरपंचायतीच्या पुढाकाराने आधुनिक सिग्नल यंत्रणेचे टेस्टिंग आज सुरू करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर बसविण्यात आलेले हे सिग्नल आता कार्यान्वित होऊ लागले असून, त्यामुळे वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून दररोज हजारो वाहनांची शहरातून ये-जा होते. विशेषतः स्टेशन रोड, टपाल चौक, बाजारपेठ, बसस्थानक आणि नेरळ-कर्जत चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती. या पार्श्वभूमीवर कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी नागरिकांच्या तक्रारींसह सातत्याने पाठपुरावा केला. त्यास पोलिस विभागाच्या शिफारशी आणि नगरपंचायतीच्या सकारात्मक भूमिकेमुळे अखेर सिग्नल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सिग्नल यंत्रणेच्या कार्यान्वयनासाठी मुख्याधिकारी तानाजी चौहाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कर्जत शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून सिग्नल यंत्रणा बसवली असून, यामुळे अपघातांची शक्यता कमी होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल.”
सिग्नल यंत्रणा लवकरच स्वयंक्रमित पद्धतीने पूर्णपणे कार्यान्वित होणार असून सध्या तिचे टेस्टिंग सुरू आहे. वाहतुकीच्या प्रमाणानुसार वेळ आपोआप समायोजित होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सुरुवातीच्या काही दिवसांत नागरिकांना या बदलाशी जुळवून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदतही मिळणार आहे. दरम्यान, नागरिकांनी नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, “कर्जत शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे,” असे मत व्यक्त केले आहे. पुढील टप्प्यात इतर चौकांवरही सिग्नल बसविण्याची योजना नगरपंचायतीकडून आखण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके