
लातूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। देवणी येथे जागृती शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज, देवणी १४ वा गळीत हंगामाचा शुभारंभ व दिलीपराव देशमुख यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून तालुक्यातील जनतेला संबोधित केले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, आजचा दिवस जागृती शुगरच्या इतिहासातील आणि आपल्या सहकार क्षेत्रातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. एकीकडे १४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे. म्हणजेच १४ वर्षांची सततची प्रगती, सातत्य आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाची साखळी आज अधिक बळकट होत आहे. तर दुसरीकडे आपल्या सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टीचे नेतृत्व असणाऱ्या दिलीपराव देशमुख साहेबांचा वाढदिवस अमृत महोत्सव साजरा करण्याचा सन्मानही आपल्या सर्वांना मिळत आहे.
देवणी परिसरात सुरू झालेली जागृती शुगर आज केवळ साखर निर्मिती करणारी संस्था नाही, तर ती शेतकऱ्यांच्या जीवनात जागृती निर्माण करणारी चळवळ ठरली आहे. मराठवाडा सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्यासाठी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्याच विचारांना अधिष्ठान मानून समाजातील सर्व घटकांसाठी काम करत आहे.
आपल्या सहकार क्षेत्राची महाराष्ट्रातली वाटचाल आज जगासाठी आदर्श ठरली आहे. सहकाराच्या बळावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे तर शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. जागृती शुगरने या सहकार परंपरेचा आदर्श घेतला “शेतकऱ्याचा कारखाना, शेतकऱ्यासाठी” या भावनेला मूर्त रूप दिलं. आज १४ व्या हंगामात प्रवेश करताना सर्व शेतकरी बांधवांना अभिनंदन देतो. कारखान्याच्या प्रगतीत तुमचं श्रम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा सर्वात मोठी ताकद आहे. आपण घेतलेले ऊस विकासाचे निर्णय, ऊर्जा बचतीसाठी केलेले प्रयत्न, आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार या सर्व बाबी आधुनिक सहकाराचं उत्तम उदाहरण आहेत.
यावेळी सुवर्णाताई देशमुख, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, जिल्हा बँक संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील सेलूकर, डी.एन दादा शेळके, मल्लिकार्जुन मानकरी सावकार, विठ्ठलराव माकणे, भगवानराव पाटील तळेगावकर, विजयकुमार पाटील, आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-----------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis