
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.)अंजनगाव सुर्जी तालुक्यातील साखरी गावात दिवस २७ आॅकक्टोबंर रोजी सकाळी माकडाने १३ वर्षीय मुलीला चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.या घडलेल्या घटनेने साखरी गाव भयभीत झाले आहे. साखरी येथील वैष्णवी प्रकाश पवार (वय १३ वर्षे) या मुलीवर माकडाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी शेतशिवारात खेळत असताना अचानक माकडाने तिच्यावर झडप घातली व तिच्या पायाला जबर चावा घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्याने मुलगी बेशुद्ध पडली होती. गावातील नागरिकांनी तात्काळ वैष्णवीला अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी अमरावती येथील इर्विन जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे साखरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात माकडांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत वन प्राण्यांच्या हौदोसाला आळा घाला व जखमी मुलीला तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा साखरी वासीयांनी केली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी