
रत्नागिरी, 28 ऑक्टोबर, (हिं. स.) : एनएसएसमधून सशक्त संस्कारित नागरिक घडतात, असे प्रतिपादन उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर -कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात या विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, मेर्वी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ. अमृता गोरीवले, शिक्षण सुधारक समितीचे कार्याध्यक्ष वसंत फडके, राधा पुरुषोत्तम पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयानंद निवेंडकर, माजी सरपंच शशिकांत म्हादे, पोलीस पाटील जयंत फडके, प्राध्यापक सचिन सनगरे, विनायक गावडे, माजी कार्यक्रमाधिकारी मकरंद दामले, निनाद तेंडुलकर, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अभिजित भिडे, सहकार्यक्रमाधिकारी प्रा रिद्धी हजारे, प्रा. सुनील भोईर, प्रा. भूषण केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. अभिजित भिडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात त्यांनी शिबिरातील सत्रांचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात सुनील गोसावी यांनी सांगितले की, शिबिरातून चांगले नागरिक घडविण्याची यशस्वी परंपरा एनएसएसमध्ये आहे. आनंददायी शिबिरातून भविष्यासाठी चांगले सोबती मिळतात व एनएसएस कुटुंब तयार होते.
निवासी शिबिरात श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, भातकापणीचा अनुभव, गणेशगुळे समुद्र परिसर व शाळा परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ, चर्चासत्रे, स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी