
त्र्यंबकेश्वर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बांधकामे पाडकामाचा वाद सुरू असतानाच, त्र्यंबकेश्वर ते घोटी या रस्त्यालगतच्या शेतकरी व व्यावसायिकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूसंपादन करण्यासंदर्भातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २० गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर (पेगलवाडी) ते घोटी या महामार्गांचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. ते त्र्यंबकेश्वर येथून पेगलवाडी, पहिने, सापगाव, आंबोली, आहुर्ली, भावली आदी गावांना जोडणारा हा एकूण ५१.९७ किलो मीटरचा रस्ता रुंद केला जाणार आहे. त्यासाठी एनएच १६० (ए) या मार्गावरील ५३.५ ते १०५.४७किलो मीटर या भागात भू-संपादन करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या संदर्भातील नोटीस १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली. त्यानंतर आता जमीन मालकांना प्रत्यक्षात नोटिसा बजावल्या जात आहेत. जमीन द्यावी किंवा त्यावर हरकती नोंदविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची ही सूचना असल्यामुळे राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना त्यात कुठलाही हस्तक्षेप करता येत नसल्याने, या भूसंपादनावरून पुन्हा संघर्ष उभा ठाकण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV