
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्य शासनाच्या कृषी विभागाने ‘साथी पोर्टल - 2’ चा वापर सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी सक्तीचा केला आहे. मात्र या पोर्टलला विरोध दर्शविण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईड्स अँड सिड्स डीलर्स असोसिएशन (MAFPDA) च्या आवाहनानुसार राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी खरेदी-विक्री बंद ठेवत राज्यव्यापी बंदचे आयोजन केले. या बंदचा परिणाम अमरावती शहर आणि जिल्ह्यातही स्पष्टपणे जाणवला. येथील सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत शांततेत आंदोलनात सहभाग घेतला. विक्रेत्यांनी आपल्या केंद्रांवर “साथी पोर्टल - 2 अंमलबजावणीविरोधात विक्रेत्यांचा निषेध” असे फलक लावून शासनाविरोधातील नाराजी व्यक्त केली. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, साथी पोर्टल - 2 द्वारे बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री प्रत्यक्षात शक्य नाही, तसेच या प्रणालीमुळे कृषी केंद्रांना अनावश्यक नियम, त्रासदायक कारवाई आणि तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. यापूर्वी कृषी विभागाने विक्रेत्यांच्या तक्रारींचा विचार करून अंमलबजावणी स्थगित करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात पोर्टलचा सक्तीने वापर सुरू असल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी एकमुखी ठराव करून या सक्तीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीत जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन करत “अभी नहीं तो कभी नहीं” अशी भूमिका स्पष्ट केली आणि आपली एकजूट अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. राज्यव्यापी बंदच्या निमित्ताने अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान म्हणजेच सर्वश्रेष्ठ दान” या घोषवाक्याला अनुसरून सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छा रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले, सचिव संजय उंबरकर, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल व अभिषेक कडू, कोषाध्यक्ष विरेंद्र शर्मा, सर्व सदस्य तसेच अमरावती जिल्हा रक्तदान समिती व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी सांगितले की, “साथी पोर्टलमार्फत विक्री व्यवहार करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरील अन्यायकारक व जाचक अटींविरोधात हा आमचा राज्यव्यापी बंद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी