नाशिकमध्ये प्रदूषणमुक्त छटपूजा संपन्न; 415 किलो निर्माल्याची सफाई
नाशिक, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोदावरी नदीकाठावरील गंगाघाट, रामकुंड व नांदुर घाट येथे उत्तर भारतीय बांधवांचा छटपूजा महोत्सव श्रद्धा, उत्साह आणि प्रदूषणमुक्त वातावरणात संपन्न झाला. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार, ग
प्रदूषणमुक्त छटपूजा संपन्न , स्वच्छता अभियानात 41 5 किलो निर्माल्या ची सफाई


नाशिक, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोदावरी नदीकाठावरील गंगाघाट, रामकुंड व नांदुर घाट येथे उत्तर भारतीय बांधवांचा छटपूजा महोत्सव श्रद्धा, उत्साह आणि प्रदूषणमुक्त वातावरणात संपन्न झाला. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार, गोदावरी संवर्धन कक्ष उपायुक्त नितीन पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त व संचालक अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

तसेच विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे यांच्यामार्फत छटपूजा आयोजक व सर्व भाविकांना प्रदूषणमुक्त पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले. भाविकांना पूजनानंतर निर्माल्य व पूजेचे साहित्य कलशात टाकणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणे, नदीपात्रात हार, फुले, कपडे, दिवे न सोडणे तसेच परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे या बाबत जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे पूजाविधी संपल्यानंतर तात्काळ घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या संस्थेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत होळकर पूल ते टाळकुटेश्वर दरम्यान लक्ष्मणकुंड, रामकुंड, निळकंठेश्वर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन आणि नांदुर घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. दोन वाहनांच्या मदतीने या परिसरातून सहा टन ४१५ किलो निर्माल्य व तत्सम कचरा संकलित करून खत प्रकल्पावर रवाना करण्यात आला.

या मोहिमेत स्वच्छता निरिक्षक राकेश साबळे, गणेश तांबे, प्रशांत तेजाळे, नंदू गवळी, किशोर साळवे, बाळू जगताप, अनिल नेटावटे, असिफ शेख तसेच मनपाचे १८ कर्मचारी आणि वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीचे विलास नाईकवाडे यांच्यासह ४५ स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande