
रत्नागिरी, 28 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोज संध्याकाळी कोसळणाऱ्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले भातपीक पावसात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा मच्छीमारी व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला २९ ऑक्टोबरपर्यंत यलो अॅलर्ट दिल्याने पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी व मत्स्य व्यवसायाला या पावसाचा जास्त फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
विजाचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यावसाय पुन्हा ठप्प झाला आहे. मत्स्य व्यवसायिकांनी आपल्या नौका जिल्ह्यातील ठिकठिकाणी असलेल्या बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. ऐन मत्स्य हंगामात व्यावसाय ठप्प झाल्याने मच्छी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला २९ ऑक्टोबरपर्यंत यलो अॅलर्ट दिल्याने जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोस्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
वीजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन फोनचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर दामिनी ॲप डाऊनलोड करून घ्यावे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी