
बीड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील युवक प्रविण बाबुराव जाधव याने बंजारा समाजाला आरक्षण मिळत नाही यासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरत गळफास लावून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या गंभीर मागणीसाठी गेवराई तालुक्यातील केंकत पांगरी येथील प्रवीण बाबूराव जाधव (वय ३५) या तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आरक्षणाच्या प्रश्नासाठी एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रवीण जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. बंजारा समाजाला न्याय मिळावा या तीव्र भावनेतून आणि समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी हा टोकाचा आणि अत्यंत दुःखद निर्णय घेतल्याचे समजते. एका ज्वलंत सामाजिक मागणीसाठी अशाप्रकारे बलिदान दिल्याने संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण जाधव यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, समाजातील नागरिकांकडून शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, तात्काळ बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. प्रवीण जाधव यांच्या बलिदानानंतर तरी शासनाने समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis